नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात अवघ्या तीन महिन्यात तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मृतांमध्ये उपजत १७ आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३५ बालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गंभीर समजल्या जाणाऱ्या तीव्र कुपोषणाने ४०९ बालक पीडित आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यातील या बालकांना वाचविण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमधून अमायलेजयुक्त पोषण आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी आदिवासी भागात हे वास्तव पुढे यावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते.
धारणी व चिखलदरा तालुक्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यात ४२५ पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांतून स्तनदा, गर्भवती माता व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो. जलजन्य आजाराची लागण होऊन कमी होणारे वजन आणि विविध आजारांनी मृत्यू पाहता मेळघाटातील बालकांची पावसाळ्यात अत्यंत जोखीम असते. धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाच्या तीव्र श्रेणीतील सॅममध्ये एप्रिल, मे महिन्यात २१३ बालकांचा समावेश होता. जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा ४०९ झाला आहे. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ३७५६ बालकांसाठी १ ते ३० जुलैदरम्यान पेसा कायद्यांतर्गत व्हीसीडीसी उघडण्यात आले आहे. त्यामध्ये अमायलेजयुक्त आहार दिला जात आहे. शिवाय आरोग्य तपासणी सुरू आहे.
उपजत १७ बालके दगावली
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल २०२२ मध्ये ६१०, मे महिन्यात ४२२, जूनमध्ये ४२०, असे १४५२ बालकांचा जन्म झाला. यापैकी शून्य ते सहा वयोगटातील एप्रिलमध्ये १५, मे महिन्यात सात आणि जूनमध्ये १३ अशी ३५, तर याच तीन महिन्यात उपजत १७ अशी ५२ बालके दगावली. सर्वसाधारण श्रेणीत ३२५७६ व मॅममध्ये ३३४७ बालके आहेत. ३८२० गरोदर व ३४१० स्तनदा माता आहेत.
मेळघाटात मागील तीन महिन्यांत उपजत आणि शून्य ते सहा वयोगटातील ५२ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा १५ने हा आकडा कमी आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता, आरोग्य झोन, विविध तपासण्या, आरोग्य सुविधा, आहार पुरविला जात आहे.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी