अमरावती : महिनाभरात तिसऱ्यांदा जोरदार वादळासह अवकाळीने नुकसान केले आहे. शुक्रवारी २४ तासांत सरासरी १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. या आपत्तीमध्ये पाच तालुक्यातील ५२३ हेक्टरमधील पिके मातीमोल झाली आहेत. याशिवाय ११२ घरांची पडझड झाली. यामध्ये एक व्यक्ती मृत तर दोन जखमी झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी एक नंतर वादळ विजांसह तासभर पावसाने दणका दिल्यानंतरही सायंकाळनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरुच होती. जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली असली तरी पाच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने गहू, कांदा, मिरची, लिंबू, संत्रा, आंबा, हरभरा व भाजीपाला पिकांचे ५२३ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. याशिवाय वीज पडून एकाचा मृत्यू व दोघे जखमी झाले आहेत. दोन जनावरे आपत्तीमध्ये मृत झाली आहेत.जोरदार वाऱ्यासह आलेला पाऊस व काही ठिकाणी झालेली गारपीट, यामुळे १११ घरांचे अंशत: व एक घर पुर्णत: नष्ट झाले आहे. याशिवाय दोन गोठ्याचेही नुकसान झाले आहे.अमरावती, अंजनगाव सुर्जीत सर्वाधिक नुकसान
जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात २८८ हेक्टर व अमरावती तालुक्यात १६० हेक्टरमधील रबी पिके व फळपिकांचे नुकसान झाले. याशिवाय भातकुली तालुक्यात ३४,८० हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.