अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना २४ एप्रिलपर्यंत ५३,३२४ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. कोरोनाचे वाढत्या संसर्गात सरासरी ८९ टक्के रुग्ण उपचारानंतर बरे झाले, ही बाब जिल्ह्यासाठी दिलासाजनक आहे.
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. यासोबतच जिल्हा सीमेलगतच्या जिल्ह्यात व राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत व वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. बेड, ऑक्सिजन अन् रेमडेसिवीरचा तुडवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर ८९ टक्के रुग्णांनी कोरोनावार मात केली. ही स्थिती या संकटकाळात दिलासा देणारी ठरलेली आहे.
जिल्ह्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत ४०,७१२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यातुलनेत ३५,३०३ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, डबल म्युटंट व्हेरियंट आदी विषाणूचे नवे रूप समोर येत असताना सुसज्ज आरोग्य सेवेनीही या सर्व प्रकाराला मात दिलेली आहे. याशिवाय निष्पन्न झालेले बहुतांश रुग्ण हे असिम्टोमॅटिक आहेत. अर्धेअधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
बॉक्स
सकारात्मक विचार, इच्छाशक्ती महत्त्वाची
औषधेच नाहीत, तर कोरोना संसर्गात इच्छाशक्तीही महत्त्वाची आहे. वास्तविकत: कोरोना झाल्याचे समजल्यावर अनेकांना नैराश्य येते. मात्र, अशावेळी खचून न जाता कोरोनावर आपण सहज मात करू, ही इच्छाशक्ती महत्त्वाची ठरते. नेहमी आनंदी राहण्यासोबत सकारात्मक विचार अवलंबण्यानेही, आपण कोरोनावर सहज मात करू शकत असल्याचे उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांनी सांगितले.
बॉक्स
कोरोना सेंटरमध्ये उत्साही वातावरण हवे
सौम्य व मध्यम स्वरूपाचे कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयात उत्साही वातावरण हवे. वारंवार कोरोनाविषयीचे वृत्त, चर्चा यामुळे खचून न जाता सकारात्मक उर्जेद्वारा यातून लवकर बरे होत असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारे सांगितले. बाधित रुग्णांचे नातेवाईक, शेजारी यांनी देखील अशा काळात रुग्णाला धीर देण्याची गरज आहे. काही गुंतागुंत झाल्यास आपण लवकरच यातून बरे होऊ, हा आत्मविश्वास देखील यावेळी महत्त्वाचा आहे.
बॉक्स
अंगावर दुखणे काढणे जीवावर बेतणारे
लक्षणे जाणवताच किंवा कुणाच्या संपर्कात आल्यास त्वरित स्वॅब द्यावा. अहवाल येईस्तोवर गृह विलगीकरणात राहावे. घरात सुविधा असल्यास होम आयसोलेशन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात उपचार घ्यावा, संपर्कात आलेल्यांचीही चाचणी करावी. त्रिसूत्रीचे पालन करावे, अंगावर दुखणे काढणे, ही जीवावर बेतणारी बाब असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी सांगितले.
पाईंटर
१ जानेवारीपासूनचे कोरोनामुक्त
१ जानेवारी : १९,०२१
१ फेब्रुवारी :२१,११७
१ मार्च : २९,५३१
१ एप्रिल : ४४,९१३
२४ एप्रिल : ५३,३२४