लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीसतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. संकटाचा सामना करताना कसे जगावे, या चिंतेने नैराश्य आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. १ जानेवारी ते ८ एप्रिल या ९८ दिवसांत ५४ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षीचा हंगाम अती पावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदाच्या हंगामात पेरणीपूर्वीच पावसाने दडी मारली. सोयाबीन शेतातच जिरले. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची वाट लागली. थोड्याफार उत्पन्नाची आशा अकाली पावसाने घालविली. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आली.सातबारा हवाय कोरा शासनाने निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची मदत दिली. या तुटपुंज्या मदतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत शेतकरी आहेत. जानेवारीमध्ये १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १८ व एप्र्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ३ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाव्दारा ३० हजारांची रोख मदत व ७० हजारांची ६ वर्षांसाठी मुदत ठेव देण्यात येते. कर्ता गेल्यानंतर ३० हजारांच्या शासन मदतीत कुटुंबाने कसे जगावे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कसं करावे ही मोठी समस्या पीडित परिवाराची आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा सातबारावर कायम राहतो. शासनाने अशा परिवाराला मदत करायची असेल तर तो सातबारा कोरा हवा आहे.
९८ दिवसांत ५४ शेतकरी आत्महत्या
By admin | Published: April 10, 2015 12:24 AM