अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी या आपत्तीमुळे ५५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय लहान-मोठी ३७७ जनावरे मृत झालेली आहेत. ४३०८ घरांची पडझड झालेली आहे. विभागात ३७ तालुक्यांतील ३७ तालुके ७७० गावांना या आपत्तीचा फटका बसला. यामुळे २०३३ कुटुंबे बाधित झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे.
अमरावती विभागात १ जून ते १० सप्टेंबर या कालावधीत ६६२.५ मिली पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११९.४ टक्के सरासरी आहे. गतवर्षी याच तारखेला ८६.२ टक्के पाऊस झाला होता. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात ३९ व्यक्ती वाहून गेल्या आहेत. तर वीज कोसळून १० जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अंगावर भिंत कोसळल्याने ३ व इतर कारणांनी ३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यामधील ३४ प्रकरणांत आतापर्यंत १.३६ कोटींचे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे.
आपत्तीमुळे मोठी दुधाळ ८८, लहान दुधाळ २२४, ओढकाम करणारी ५५ व ओढकाम करणारी लहान १० असे एकूण ३७७ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पशुपालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे.
४३०८ घरांची पडझडया आपत्तीमध्ये ६३ घरांची पूर्णत: पडझड झालेली आहे, तर ७८० घरांची अंशत: पडझड झाली. शिवाय ३४६० कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये ५ झोपड्या, तर १३७ गोठे नष्ट झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाद्वारा सर्व्हे करण्यात येत असून, पात्र प्रकरणात महसूल विभागाद्वारा सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान
- अतिवृष्टीमुळे विभागात २,५२,८३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे १४७९ हेक्टरमधील पिके खरडली गेली, तर पुरामुळे १६३ हेक्टरमध्ये गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे.
- अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात १,७५,६२७ हेक्टर, अमरावती ५,८११ हेक्टर, अकोला ५१,०५६, वाशिम १०,४१२ हेक्टर व बुलडाणा जिल्ह्यात ९,९३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.