गणेश वासनिक
अमरावती : राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे.
वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात. मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.
विदर्भात अधिक संख्या
राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे.
सहायक वनसंरक्षक प्रतीक्षेत
राज्यात सध्या सहायक वनसंरक्षकांची ४८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टक्क्याप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढती देणे अपेक्षित आहेत, तर सहायक वनसंरक्षकांची राज्याचे वनविभागात ४८ पदे रिक्त आहेत, याशिवाय विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बोजवारा उडाला आहे. काही पदे ही दोन-दोन वर्षांपासून रिक्त ठेवण्याचा हेतू लक्षात येत नाही.