अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला येथे मेफेड्राॅन ‘एमडी’ ड्रग्ज हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अकोला व बुलढाणा जिल्हयातील रहिवासी दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली. आरोपींकडून ५७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात त्या दोन आरोपींविरूध्द एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अलिकडच्या काळात एमडी ड्रग्स पकडण्याची ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
एलसीबीनुसार, २२ वर्षीय दोन तरूण सोमवारी दुपारी अंजनगाव अकोट मार्गावरील कारला येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या आधारे पथकाने सापळा रचून त्या दोघांना दुपारी तीनच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून ५७ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आली. तीन हजार रुपये प्रतिग्रॅम प्रमाणे त्या एमडीची किंमत सुमारे १.७१ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
दोन्ही आरोपींची अंजनगाव पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदाने, पंकज फाटे, सय्यद अजमत, रवींद्र बावणे, गजेंद्र दाभणे, नीलेश डांगोरे, दिनेश कनोजीया, अमोल केंद्रे यांनी ही कारवाई केली.
रिसिव्हरचा शोध लावणार
ते दोन तरूण कारला येथे ती एमडी नेमकी कुणाला देणार होते, थेट ग्राहक होता, की एजंट की नुसता रिसिव्हर, या सर्व बाजुंनी आरोपींना विचारणा केली जात असून, मंगळवारी त्यांना न्यायाालयासमोर हजर केले जाणार आहे. यातील २१ वर्षीय आरोपी शेगाव तालुक्यातील जवळा बू. येथील तर, दुसरा २२ वर्षीय आरोपी हा अकोला जिल्हयातील अंत्री मलकापूर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता. तत्पुर्वी, स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी परतवाडयाहून दोन आरोपींकडून दोन देशी कट्टे जप्त केले, हे विशेष.