अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून २८ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता पीएम किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता व राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे. याद्वारे महाराष्ट्रातील ८८ लाख शेतकऱ्यांना ५७६० कोटींचा लाभ मिळणार आहे. या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ६००० रुपये जमा होतील.
केंद्र शासनाद्वारा शुक्रवारी व्हीसीद्वारे तसे निर्देश दिले आहेत व याअनुषंगाने कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी पत्राद्वारे कळविले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही योजनेचा लाभ पात्र शेतकरी खातेदारांना देण्यात येणार होता. मात्र, याचा मुहूर्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावात निघाला आहे.
२८ फेब्रुवारीला पंतप्रधानांचा येथे दौरा आहे व या दौऱ्यात त्यांच्याद्वारा एका क्लिकद्वारे ५,७६० कोटींचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात होणार आहे. त्यामुळे हा दिवस जिल्हा, तालुका व गावपातळी व केव्हीके, सीएससी केंद्र येथे ‘पी. एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना कृषी संचालकांनी दिल्या आहेत. या कार्यक्रमात खासदार, आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आंमत्रित करावे व लिंकद्वारे शेतकऱ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या सूचना आहेत.पंतप्रधानाच्या एका क्लिकवर असा मिळणार लाभ१) पीएम किसान योजना १६ वा हप्ताशेतकरी लाभार्थी : ८८ लाखमिळणारा लाभ : १९६० कोटी२) नमो शेतकरी महासन्मान निधी (दुसरा व तिसरा हप्ता)शेतकरी लाभार्थी : १.७३ लाखमिळणारा लाभ : ३८०० कोटीपी.एम. किसान सन्मान योजनेंमधील १६ व्या हप्याचे पात्र लाभार्थी व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून २८ फेब्रुवारीला होईल.या अनुषंगाने हा दिवस पीएम किसान उत्सव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना आहेत.-किसनराव मुळे, कृषी सहसंचालक