अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये प्रक्रियेतील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, तसेच अधिकारी व कर्मचारी यांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. यामध्ये ४२ पेक्षा उमेदवार व १६ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच गहजब उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांना अर्जासोबत आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. याचसोबत निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाचे दिवशी मुख्यालयी असलेल्या नमुने संकलन केंद्रावर चाचणीसाठी नमुने देण्यात आले. याशिवाय उमेदवारांसाठी प्रत्येक तालुक्यात नमुना संकलन केंद्र सुरू आहे. या ठिकाणचे नमुने अमरावती विद्यापीठाचे विषाणू परीक्षण केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आले असता पॉझिटिव्हची संख्या नोंद झालेली आहे. धारणी तालुक्यात एकाच दिवशी २८ उमेदवार अन् कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत. यापैकी काही गृहविलगीकरणात, तर काहींवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अमरावती तालुक्यातदेखील २९ डिसेंबरला १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच गोंघळ उडाला. या सर्वांचे संपर्कात असलेल्या व्यक्तींचेदेखील नमुने तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शौलेश नवाल यांनी सांगितले.
बॉक्स
प्रत्येक व्यक्तींच्या तापमानाची तपासणी
निवडणूक प्रक्रियेत हॉल, कक्ष, आदी ठिकाणी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची तपासणी करण्यात येत आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार सॅनिटायझर, साबण व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहेत. याशिवाय प्रक्रियेतील सर्व व्यक्तींना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याचे निर्देश आहेत.
कोट
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी अन् उमेदवारांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. यामध्ये ४० वर उमेदवार व १२ ते १५ अधिकारी कर्मचाऱ्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे पालन केले जात आहे.
शौलेश नवाल, जिल्हाधिकारी