अमरावती : महापालिकेने चार वर्षांपूर्वी शाळा, कॉलेज, रुग्णालये आणि न्यायालये आदींपासून शंभर मीटरच्या परिसरात ‘सायलेन्स झोन’ निर्माण केले. महापालिका क्षेत्रात एकूण ५८१ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. तेथे फलके देखील लागली. ही शांतता ठिकाणे ठरवताना, तेथून जाणारे रस्तेही शांतता क्षेत्राला जोडले गेले. तिथे लाऊडस्पीकर, बँजो लावल्यास वा ध्वनिप्रदूषण झाल्यास कारवाई होईल, अशी सूचना देणारे फलकही महापालिकेने उभारले. प्रत्यक्षात यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शहरातील शांतता क्षेत्र केवळ फलकांवरच राहिल्याचे दिसते. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ‘भोंगे व ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा संपूर्ण राज्यभर चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सायलेन्स झोनच्या मुद्द्यावर 'लोकमत'ने टाकलेला प्रकाशझोत.
सायलेन्स झोन अर्थात शांतता क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास बंदी आहे. अलीकडे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी धार्मिक प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपकाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागर चालविला आहे. सायलेन्स झोनमध्ये कर्णकर्कश हॉर्न वाजवत, लग्नप्रसंग, वरातीत १५० डेसिबलचा डीजे वाजविला जातो. तथापि, नो हॉर्न आणि सायलेन्स झोनमध्ये कायदा मोडल्यास कारवाई कुणी करायची, या एकमेकांकडे होणाऱ्या अंगुली निर्देशामुळे सायलेन्स झोन कागदोपत्रीच राहिल्याचे वास्तव आहे. सायलेन्स झोनमध्ये वाहन कितीही दामटले, हॉर्न कसाही वाजविला, तर अडवतंय कोण, अशी पक्की धारणा झाल्यामुळे शांतता क्षेत्रातील ध्वनिप्रदूषण दुर्लक्षित राहिले आहे. ते सायलेन्स झोन वाहनधारकांच्या खिजगिणतीत देखील नाही.
अशी आहे कायदेशीर तरतूद
महापालिकेने जाहीर केलेल्या शांतता क्षेत्रात वाद्य, कर्कश हॉर्न वाजविल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. सायलेन्स झोनमध्ये किंवा इतर भागात परवानगीशिवाय वाद्य वाजविल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ नुसार दंड होऊ शकतो. कोर्टात खटला दाखल होऊ शकतो. वाद्य जप्त करण्याच्या कारवाईचीदेखील तरतूद आहे.
शांतता क्षेत्रात किती मर्यादा ?
शांतता क्षेत्र अर्थात सायलेन्स झोनमध्ये दिवसा ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे; मात्र शहरातून मिरवणूक, लग्नाची वरात वा अन्य कार्यक्रमावेळी डीजे वाजविला जातो. न्यायालय, दवाखाने या शांतता क्षेत्रातून त्या पुढे जातात; मात्र पोलीस वा महापालिकेकडून कुठलीही कारवाई होत नाही.
महापालिका हद्दीत एकूण ५८१ शांतता क्षेत्रे आहेत. ती २०१८ ला घोषित करण्यात आली. त्यापूर्वी ४७८ शांतता क्षेत्रे होती. तेथे महापालिकेकडून फलके लावण्यात आली आहेत.
महेश देशमुख, पर्यावरण संवर्धन अधिकारी, महापालिका