लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नऊ मोठे, २५ मध्यम व ४७७ असे एकूण ५११ प्रकल्पांमध्ये सरासरी ५८.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मात्र, शंभर टक्के प्रकल्प भरण्याकरिता दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
५ ऑगस्टपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ५११ सिंचन प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. त्यापैकी आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १९१३.६८ दलघमी असून, त्याची टक्केवारी ५८.२८ आहे.
पाऊस थांबल्यामुळे फक्त यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे फक्त उघडण्यात आले आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा साचला, तर रबी पिकांना सदर प्रकल्पातून पाणी देता येणार आहे. त्यामुळे सिंचनाची सोय होणार आहे.
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ५९.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १०० टक्के, अरुणावती ७२.५६ टक्के, बेंबळा ६८.५४ टक्के, अकोला जिल्ह्याील काटेपूर्णा प्रकल्पात ७४.६७ टक्के, वान प्रकल्पात ५४.२८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा २८.१७ टक्के, पेनटाकळी ३३.४० टक्के, खडकपूर्णा सर्वांत कमी १३.६६ टक्के पाणीसाठा आहे. काही प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा साचला असून काही प्रकल्पांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.
चार प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा
यवतमाळ जिल्ह्यातील पूस हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, याच जिल्ह्यताील सायखेडा मध्यम प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी व बुलडाणा जिल्ह्यतील कोराडी मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.