अमरावती: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली ‘नीट’ परीक्षा ही रविवारी जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रावर पार पडली. यावेळी ५,८४२ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडील मोबाइलसह इतर गॅजेट काढून घेण्यात आले. त्याचबरोबर बूट काढण्यास लावून तपासणी करण्यात आली तसेच बेल्टही परीक्षा केंद्राबाहेरच काढून घेण्यात आले, तर विद्यार्थिनींनादेखील त्यांच्या गळ्यातील, कानातील तसेच नाकातील दागदागिने काढल्यानंतरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा पास करावी लागते. रविवारी दुपारी २ ते ५.२० यावेळेत ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ६००४ विद्यार्थी पात्र होते. त्यांच्यासाठी जवळपास १२ परीक्षा केंद्रे होती. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंतच वेळ दिली होती. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या तापत्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लांबच लांब रांग परीक्षा केंद्रावर पहायला मिळाली तसेच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण प्रक्रियेला सामोरे जावे लागले. यावेळी सर्वच विद्यार्थांची कडक तपासणी करीत त्यांच्याकडील मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक घड्याळ तसेच इतर गॅजेट काढून घेण्यात आले. जे विद्यार्थी बूट घालून आले होते, त्यांचे बूट काढून पूर्ण तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांचे बेल्टही काढून ठेवण्यात आले.
विद्यार्थिनींच्या हाय हीलच्या सॅन्डल तसेच दागदागिनेही काढून घेण्यात आले. हॉल तिकीट, पासपोर्ट फोटो आणि आधार कार्डच विद्यार्थ्यांना आत नेण्यास परवानगी होती. विद्यार्थ्यांना पेनदेखील केंद्रावरच उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील १२ केंद्रावर एकूण ५८४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १६२ विद्यार्थी विविध कारणांनी गैरहजर होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास ५६० च्या जवळपास अधिकारी-कर्मचाऱ्यांची परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती.