अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे बुधवारी एका २८ वर्षीय तरुणाच्या मानेवरील सूक्ष्म नाडीमध्ये असलेल्या कर्करोगाच्या गाठीची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया दुर्बीणद्वारे करण्यात आली असून तब्बल सहा तास ही शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेनंतर या युवकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
धारणी तालुक्यातील एका २८ वर्षीय युवकाच्या मानेच्या सूक्ष्म नाडीमध्ये गाठ झाली होती. त्यामुळे हा युवक उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे दाखल झाला होता. याठिकाणी या गाठीची चाचणी केली असता ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान करण्यात आले होते. तसेच ही गाठ मेंदूपासून तर मानेपर्यंत वाढली होती. कमी लोकांमध्ये हा आजार आढळून येतो. या आजारामध्ये संबंधित व्यक्तीला कायमचे अपंगत्व तसेच त्याला श्वास घेण्यास त्रास आणि त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. योगेश सावदेकर, डॉ. अमोल ढगे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख यांनी यशस्वी केली. यावेळी अधिसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका दीपाली देशमुख, मनीषा रामटेके, विजय गवई, जीवन जाधव, अभिजित उदयकर यांनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.