अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर केलेल्या ६ हजार २९६ घरकुलांचे लाभार्थ्यांना आठवडाभराचे आत पहिला हप्ता तत्काळ अदा करण्याचे आदेश विभागीय उपाआयुक्त विकास शाखा यांनी २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनांतर्गत सर्व घरकुले कालबद्ध पद्धतीने ३१ मार्च २०२४ पर्यंत प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत सूचना दिलेल्या आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये घरकुलास मंजुरी दिल्यानंतर ७ दिवसांच्या आत पहिला हप्ता वितरण करणे आवश्यक आहे, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार २९६ घरकुुलांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्यापपर्यंतही या घरकुलाचे लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरित केलेला नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील मंजुरी दिलेल्या सर्व घरकुलांना पहिला हप्ता तत्काळ वितरित करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा जिल्ह्याचे उद्दिष्ट इतर राज्याला जाणार असल्याचे केंद्र शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित हप्त्यांचे वितरण करणे. तसेच, ३१ मार्च २०२४ पर्यंत सर्व घरकुले पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विकास शाखेचे उपायुक्त यांनी सीईओंना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले असून, यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामीण गृह अभियंता, सर्व तालुकास्तरीय नोडल अधिकारी, जिल्हा प्रोग्रामर आदींना ही कारवाई विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत सीईओंची सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले आहेत. यामुळे आता जिल्हाभरातील ६ हजार २९६ मंजूर घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता बळावली आहे.