लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवशाही बसमध्ये संशयास्पद तीन पार्सलमध्ये तब्बल ६० किलो चांदी आणि १० ग्रॅम सोन्याचे एक नाणे आढळून आले. येथील सराफा लाईनमध्ये जप्त केलेला माल शनिवारी मध्यरात्रीपर्यंत मोजमाप करण्यात आला. जप्त ऐवज ४१ लाख ५९ हजार रुपयांचा असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली.पोलीस सूत्रांनुसार, कुरिअर बॉयकडून हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे शनिवारी अमरावतीला आणले गेले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावली आहे. कोल्हापूरच्या पाच व राजकोट येथील दोन सुवर्णकारांनी हा चांदीचा माल नागपूरच्या छोट्या व्यापाऱ्यांना पाठविला होता. ज्या व्यापाऱ्यांचा हा माल होता, त्यापैकी कोल्हापूरच्या सुवर्णकारासह राधाकृष्ण कुरिअरचा संचालक हे दोघेही रविवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी त्या दोघांचेही बयाण नोंदविले. जो व्यापारी रविवारी ठाण्यात दाखल झाला, त्याचा जप्त पार्सलमध्ये सहा ते साडेसहा लाखांचा माल होता. तो माल परत मिळावा म्हणून काही देयकाच्या प्रती त्यांनी ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांना दाखविल्या. परंतु, पोलिसांनी जप्त चांदी त्या व्यापाऱ्याला देण्यास नकार दिला. ज्या दोन कुरिअर बॉयना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना रविवारी सोडण्यात आले. कोल्हापूरच्या व्यापाऱ्यासह कुरिअर सर्व्हिस संचालकांचे बयाण पोलिसांनी नोंदविले.
विक्रेता, खरेदीदारांची कसून चौकशी सोने-चांदीच्या दागिन्यांच्या प्रवासाबाबत संभ्रम कायम आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी सहा विक्रेते व सहा खरेदीदारांची कसून चौकशी केली. दागिन्यांचा मुद्देमाल हा न्यायालयीन परवानगीशिवाय देता येणार नाही, अशी भूमिका ठाणेदार मेश्राम यांनी घेतली.