पोलीस आयुक्तांची कारवाई : परवाने नसणाऱ्यांच्या पालकांना अटक करणार अमरावती : धूम स्टाईलने दुचाकी पळविणाऱ्या तब्बल ६० स्टंटराईडरची यादी पोलीस विभागाने तयार केली आहे. या सर्व तरुणांना पोलिसांकडून विचारणा केली जाणार असून त्यांची बॅक हिस्ट्री तपासली जाणार आहे. ज्या अल्पवयीन मुलांजवळ किंवा तरुणांजवळ वाहन परवाना आढळून येणार नाही, अशांच्या पालकांवर कारवाई करण्याचा मनसुबा पोलीस आयुक्तांनी जाहीर केला आहे. शहरात स्टंट राइडिंगचे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. २६ जानेवारीला तर धूम स्टाईल बाईकर्सने तर अक्षरश: कळस गाठला होता. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने अशा बाईकस्वारांवर कारवाईचा दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. अतिशय बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे पदपथांवर चालणाऱ्यांसह अन्य वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. वाढत्या स्टंट राइडिंगच्या प्रकाराने अपघाताची शक्यता अधिक बळावली असून यात भर पडण्याची दुश्चिन्हे आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या स्टंट राइडिंगच्या एका घटनेत सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. भरधाव वेगाने दुचाकी चालवून सर्वसामान्यांना वेठीस धरणारे हे स्टंट राइडर आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी अशा स्टंटबाजांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी यात नवनव्या महाविद्यालयीन टोळींचा नव्याने शिरकाव होत असल्याने पोलिसी कारवाईला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस आयुक्तांनी स्टंट राईडिंग करणाऱ्यांची यादीच वाहतूक पोलिसांनी मागितली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ६० स्टंट राईडरची यादी तयार केली असून या स्टंट राइडिंगचे व्हिडिओ व छायाचित्रेसुद्धा पोलिसांकडे उपलब्ध आहेत. या सर्व स्टंट राईडर्सना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावून प्रथम त्यांचे समुपदेशन केले जाणार असून त्यांच्या बेदरकारपणाची इत्यंभूत माहिती त्यांच्या पालक आणि महाविद्यालय व्यवस्थापनास दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)पालकाला अटक करण्याचे निर्देशदोन दिवसांपूर्वी स्टंट राईडिंग करणाऱ्या अल्पवयीन मुलाने सायकलस्वार विनोद पांडे यांना धडक दिली. या अपघातात पांडे यांचा मृत्यू झाला. पांडे यांच्या अपघाताला त्या अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा कारणीभूत ठरला. या घटनेनंतर पुजाऱ्यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर संबंधित मुलांच्या पालकाला अटक करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिलेत.
शहरातील ६० ‘स्टंट राईडर’ पोलिसांच्या रडारवर
By admin | Published: February 14, 2017 12:01 AM