पंकज लायदे/लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील काकरमल गावातील एका ६० वर्षीय आजोबाने गावातीलच एका ५५ वर्षीय विधवा महिलेशी लग्नगाठ बांधली. सोमवारी धारणी पोलीस ठाण्याच्या आवारातील हनुमान मंदिरात पोलिसांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.मेळघाटातील काकरमल गावातील रहिवासी जयराम बाबू बेठेकर (६०) यांच्या पत्नीचे तीन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. त्यांच्या शेतात गावातीलच चंदा भाऊलाल जावरकर (५५) या अन्य मजुरांसोबत शेतमजुरीसाठी यायच्या. चंदा यांच्या पतीचे तीन-चार वर्षांपूर्वी निधन झाले. अशातच जयराम बेठेकर यांच्याशी चंदा जावरकर यांची मैत्री जमली. त्यावरून गावातील नातेवाइकांनी तिच्यावर संशयाची सुई रोखली. आरोप-प्रत्यारोप केले. त्यामध्ये खुद्द मुलगा, सून, दीर, भावजयीचा समावेश होता. चंदा यांनी पोटतिडकीने नातेवाइकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीएक न ऐकता तिला मारहाण करण्यात आली, बाहेर काढण्यात आले. २० सप्टेंबर रोजी चंदा यांनी शेत गाठले आणि जयराम यांना हकीकत सांगितली. नातेवाईक घरात घ्यायला तयार नाहीत; तुम्ही मला ठेवणार का, अशी विचारणा केली. जयराम यांनी होकार दिला. नातेवाइकांकडून मारहाणीच्या भीतीने चंदा यांनी शनिवारपासून जयराम यांच्यासोबत त्यांच्याच शेतामध्ये वास्तव्य केले. त्यानंतर त्या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.सोमवारी गावातील काही नागरिकांना सोबत घेऊन या जोडप्याने धारणी पोलीस ठाणे गाठले. तेथे उपस्थित पोलिसांना आम्ही दोघेही लग्न करीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस व गावक ऱ्यांच्या साक्षीने त्यांनी ठाण्यातील हनुमान मंदिरात लग्न करून एकत्र राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या अनोख्या विवाहाची चर्चा सर्वत्र रंगत आहे.
जिंकलंत आजोबा; मुलांनी घराबाहेर काढलेल्या ५५ वर्षीय विधवेशी बांधली लगीनगाठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:41 AM
मेळघाटातील काकरमल गावातील एका ६० वर्षीय आजोबाने गावातीलच एका ५५ वर्षीय विधवा महिलेशी लग्नगाठ बांधली.
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात विवाहमैत्रीतून एकत्र राहण्याचा निर्धार