अमरावती : अपुऱ्या पावसामुळे बाद झालेला खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केली. यामध्ये पश्चिम विदर्भातील ६३१८ गावांमध्ये पैसेवारी ५० आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त २००७ गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अधोरेखित झाली आहे. यामध्ये ८९८ गावांमध्ये ५० च्या वर पैसेवारी आहे. त्यामुळे कमी पैसेवारीच्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मध्ये बदल करून सुधारित संहिता ७ ऑक्टोबर २०१७ ला जाहीर केली. यामध्ये शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती विहीत करण्यात आली. सुधारित निकषानुसार पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद् आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक आणि पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण व सत्यापनाचा विचार करण्यात येतो. त्यानुसार अमरावती विभागात १४ तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा व १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा असे एकूण २८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर ४७ महसूल मंडळांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली.
मात्र, उर्वरित तालुक्यात हीच स्थिती कायम असल्याने विभागीय आयुक्त खरिपाची अंतिम पैसेवारी काय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विभागाची सरासरी पैसेवारी ५० आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यात ६२, अमरावती ४८, अकोला ४७, यवतमाळ ४७ व बुलडाणा जिल्ह्यात ४५ पैसेवारी जाहीर करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १५७ व बुलडाणा जिल्ह्यात ७४१ असे एकूण ८९८ गावांमध्ये मात्र पीकस्थिती उत्तम असल्याचा जावईशोध महसूल विभागाने लावला आहे.
पैसेवारीची जिल्हानिहाय स्थिती- अमरावती जिल्ह्यात १९६४ पैकी १५७ गावांत जास्त व १८०७ गावात ५० पैसेचे आत पैसेवारी आहे.- अकोला जिल्ह्यात ९९१ पैकी सर्वच गावात ५० पैशांचे आत पैसेवारी आहे.- यवतमाळ जिल्ह्यात २०४८ पैकी सर्वच गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी आहे.- वाशिम जिल्ह्यात ७९३ पैकी ७४१ गावांत जास्त, तर ५२ गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी आहे.- बुलडाणा जिल्ह्यात १४२० पैकी सर्वच गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी आहे.