लोकमत न्यूज नेटवर्क येवदा : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय वृद्धाने अत्याचार केला. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी अटक केली.
पोलिस सूत्रांनुसार, प्रकाश (६५) या आरोपी वृद्धाने घरापुढे खेळत असलेल्या चिमुकलीला पैसे व चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी बराच वेळ घराबाहेर आहे, ही जाणीव होताच तिच्या आईने बाहेर डोकावले. मात्र, ती घरापुढे खेळताना दिसत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी ती गावात फिरली. अशातच गावातीलच एका महिलेने प्रकाशने तिला सोबत नेल्याची माहिती दिली. आईने आरोपीच्या घरी जाऊन पाहिले असता, त्या मुलीचे कपडे रक्तस्रावामुळे लाल झाले होते आणि प्रकाशच्या अंगाला रक्त होते. दरम्यान नागरिकांनी त्याला घेराव घातला. मात्र त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे पुढे पोलिस ठाण्यातदेखील मोठा जमाव एकत्र झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले.
नागरिकांच्या गराड्यातून निसटला आरोपी प्रकाशचे कृत्य पाहून हादरलेल्या चिमुकलीच्या आईने आरडाओरड केल्या नागरिक गोळा झाले. मात्र, त्याच वेळी आरोपी या गराड्यातून निसटला आणि शिवारात जाऊन लपला.
शिवारातून घेतले ताब्यात ठाणेदार राहुल देशमुख यांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चमू रवाना केली. आरोपी घटनास्थरावरून फरार झाला होता. त्याला शोधण्याकरिता अमरावती येथील एलसीबी चमूदेखील सक्रिय झाली. एलसीबी पथकाने त्याला वरूड कुलट शिवारातून ताब्यात घेतले.
पोलिसात तक्रार मुलीने घडलेली हकीगत आपल्या आईला सांगितली तेव्हा तिच्यासमवेत आई-वडिलांनी येवदा पोलीस ठाणे गाठले. या खळबळजनक घटनेमुळे येवदा पोलिस ठाण्यापुढेही नागरिकांनी गर्दी केली होती.