अमरावती, दि. 2 - जालना व अमरावती येथील जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मुद्रा बँक योजनेचा प्रचार व प्रसार आणि समन्वय करण्याकरिता ६७ लक्ष ३० हजारांचा निधी शासनाने शुक्रवारी मंजूर केला आहे. मुद्रा बँक योजनेचा लाभ घेणा-या तरूणांना यामधून योग्य माहिती मिळणार आहे.
हा निधी मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीला मिळणार असून २०१७-१८ या वर्षाकरिता सदर निधीचे वितरण होणार आहे. यामध्ये जालना जिल्ह्यासाठी ३० लाख ८० हजार तर अमरावती जिल्ह्याकरिता ३६ लाख ५० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. शासन निर्णयान्वये मुद्रा बँक योजना ग्रामीण दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू आणि होतकरू व्यक्ती तसेच बेरोजगारांना व्हावा, या हेतूने ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनमानसात प्रभावीपणे प्रचार व प्रसार आणि समन्वय करण्याकरिता राज्यातील जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजना समन्वये समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
सदर निर्णयास अनुलक्षूण मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीकडून खर्चाबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जालना व अमरावती यांचेकडून सन २०१७-१८ या वित्तीय वर्षासाठी मुद्रा बँक योजनेचा प्रचार व प्रसारासाठी आणि समन्वये करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे