अमरावती : निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सादर करण्यात येणाऱ्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदीच्या अनुषंगाने यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सात उपविभागात पाच वर्षांमध्ये तब्बल ६८ हजार ४७७ कुणबी जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जात याविषयीचे पुरावे मिळाले आहेत. याशिवाय अन्य १३ यंत्रणांद्वारेही शोधमोहीम सुरू असल्याने पुराव्यांची संख्या वाढणार आहे.
मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे जुने पुरावे अनिवार्य आहेत. यामध्ये निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज आदी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत १५ सदस्यांची समितीद्वारा पुराव्यांची शोधमोहीम सुरू आहे. हे पुरावे न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सादर करण्यात येणार आहे. दिवाळीदरम्यान सलग सुट्यांमुळे समितीचे कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून येते.