पत्रपरिषद : डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉक्टरांवर होत असलेले भ्याड हल्ले व त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ६ जून रोजी दिल्ली येथे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्यावतीने देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दिल्ली चलो’ अभियानांतर्गत हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आयएमएचे राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे यांनी बुधवारी पत्रपरिषदेमधून दिली. आयएमएचे राज्य उपाध्यक्ष वसंत ुलंगे, अमरावतीचे अध्यक्ष बी.आर. देशमुख यांच्या माहितीनुसार, देशभरात डॉक्टरांवरील हल्ले वाढले आहे. जवळपास १८ राज्यांमध्ये अशा हल्ल्यांविरोधात कायदे करण्यात आले आहेत. परंतु हे प्रकार वाढत आहेत. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक कायदा संसदेने मंजूर करावा, आयएमए जेनेरिक औषधी वापराच्या बाजूने आहे. परंतु या औषधांची गुणवत्ता व एकसमान किंमत याबाबत सरकारने खात्री व हमी द्यावी, केंद्र सरकार मेडिकल कौन्सील आॅफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी पूर्ण लालफितशाही असलेले नॅशनल मेडिकल कमिशन आणू पाहात आहे. त्याऐवजी मेडिकल कौन्सिल आॉफ इंडिया याच संस्थेत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, एमबीबीएस अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विविध प्रकारच्या परीक्षा सरकारमान्य विद्यापीठातून देतो. तरिदेखील एमबीबीएस उत्तीर्णनंतरही प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी ‘नेक्स्ट’ नावाने आणखी एक परीक्षा सुरू करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याने ही परीक्षा रद्द करावी, एमबीबीएसची अंतीम परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घ्यावी, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ४५ दिवसांच्या आत ‘नीट’ ही परीक्षा घ्यावी. तसेच आंतरवासिता प्रशिक्षण देशभरात एकाच तारखेला सुरु करावे, आदी मागण्यांसाठी जून महिन्यात दिल्ली येथील राजपथ ते इंदिरा गांधी इनओडर स्टेडिअमपर्यंत विशाल मोर्चा काढला जाईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष बी. आर. देशमुख, सचिव दिनेश वाघाडे, हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडियाचे चेअरमन दिनेश ठाकरे, पद्माकर सोमवंशी, पीआरओ संदीप दानखडे, सहसचिव पंकज घुंडीयाल, स्त्रीरोगतज्ज्ञ अलका कुथे, एसएएमसीचे सचिव गोविंद गुट्टे आदी उपस्थित होेते.
६ जूनला आयएमएचा दिल्लीत मोर्चा
By admin | Published: May 18, 2017 12:18 AM