अमरावती : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील वर्षानुवर्षे भरती न केल्यामुळे शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात मराठी माध्यमाची सर्वात जास्त ४४८१, तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी १७ पदे रिक्त आहे. उर्दू माध्यमाची पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त ३६ पदे रिक्त आहेत, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ३ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एकही जागा रिक्त नसल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाने शिक्षक बदली पोर्टलवर ४ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केलेली आहेत.
आदिवासीबहुल भागात बिगर आदिवासी कर्मचारी कामात फारसा रस घेत नाही. कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसल्यामुळे आदिवासींना सेवा, सुविधा पुरविण्यात अडचणी येतात. अनुसूचित क्षेत्रात विविध सेवा, सुविधांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यघटनेतील ५व्या अनुसूचितील परिशिष्ट ५ (१) नुसार अधिसूचना काढून १७ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीमधून भरण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वीच घेतला आहे. यात 'शिक्षक' हे पद आहे. अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची भरतीच करण्यात न आल्यामुळे ७ हजार १८७ पदे सन २०१४ पासून रिक्तच आहेत.
अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदे तर सोडाच. परंतु, शिक्षक या एका संवर्गातील पदे आठ वर्षापासून भरण्यात आलेली नाहीत. आता राज्य शासनाने तरी अनुसूचित क्षेत्रातील पदभरती भरण्यात यावी
- आजाबराव उईके, राज्य उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र