सुट्टी काळात मोबाईल बंद चे वाढले फॅड
आपत्ती काळात कशी मिळणार मदत
लोकमत रियालिटी चेक
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा अशी कामकाजाची वेळ ठरवीत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला. उर्वरित दोन दिवस कुटुंबात रममाण होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद ठेवण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याच्या काळात दोन दिवस तब्बल ७० टक्के तालुका प्रशासन ‘नॉट रीचेबल’ असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राज्यात पाच दिवसांपासून पावसाचा तांडव पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातही काही भागांना या पावसाचा मोठा तडाखा बसला. धामणगाव तालुक्यात पावसाची रिपरिप असली तरी बगाजी सागर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने तीन दरवाजे उघडले. तालुक्यात वर्धा, चंद्रभागा, मोती कोळसा, विदर्भ अशा नद्यांसह बारा मोठे नाले आहेत. या नदी नाल्याला पूर आला, तर १७ गावांमध्ये कधीही पाणी शिरू शकते. अशा वेळी ग्रामस्थांना प्रशासनाच्यावतीने तात्काळ मदत गरजेची असते. मात्र, ज्यावेळी गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची मदत हवी, त्यावेळी त्यांचे मोबाईलच जर बंद असतील, तर आधार मागायचा कुणाकडे, असा सवाल निर्माण झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने या दोन दिवस केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन समिती कागदावरच
आपत्तीकाळात तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक, मंडळ अधिकारी, गावातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील मुख्याध्यापक, स्वस्त धान्य दुकानदार, महावितरणचे कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पशुचिकित्सक अधिकारी यांची व्यवस्थापन समिती नदी-नाल्यांजवळील गावात कार्यरत असते. पावसाने घर पडले, घरात पाणी शिरले, तर त्या कुटुंबाला त्वरित आधार देण्यासाठी या समितीचे सदस्य कार्यशील असणे महत्त्वाचे आहे. मात्र, शनिवार-रविवारी सुटी असल्यामुळे या समितीतील महत्त्वाचे सदस्य आपले कर्तव्य विसरले असल्याची बाब समोर आली.
या यंत्रणेचे मोबाईल बंद
शनिवार-रविवार या दोन दिवसांत ग्रामस्थांनी महत्त्वाच्या कामानिमित्त फोन करूनही बारा तलाठ्यांनी फोन रिसिव्ह केला नाही, तर सात ग्रामसेवकांचे मोबाईल ‘नॉट रीचेबल’ होते शेतात पाणी अधिक जमा झाल्यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी कृषिसहायकांना फोन केला तेव्हा ते उचलत नसल्याची माहिती पुढे आली. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार घ्यायला कुणीच तयार नव्हते. जनावरे आजारी असताना उपचार करणारा अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागितले, तर पशुचिकित्सक फोन रिसिव्ह करीत नाही, अशी माहिती प्रत्यक्षात पुढे आली.
ग्रामस्थ काय म्हणतात?
आपत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. सुटीच्या दिवशी कर्मचारी गावात नसेल तर चालेल, मात्र मोबाईल बंद ठेवणे योग्य नाही. संकटाच्या वेळी न धावणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा काय ठेवायची, असा प्रश्न काही ग्रामस्थ करतात. महिन्याभराच्या वेतनातून सुटीच्या दिवशी वेतन कपात करावे, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कर्मचारी म्हणतात - सकारात्मक दृष्टीने पाहा
आमची नोकरी एकीकडे, तर कुटुंब शंभर किलोमीटर अंतरावर राहते. अशात वृद्ध मातापित्यांना तसेच चिमुकल्यांना भेटण्यासाठी आम्ही जातो. आम्ही पाच दिवस गावात मुक्कामी राहतो. काही ग्रामस्थ त्यांच्या कामासाठी येत नाही, मात्र सुटीच्या दिवशी क्षुल्लक कारणासाठी मोबाईलवरून अधिक त्रास देतात. आम्ही शासकीय नोकर असलो तरी एक माणूस आहोत. त्यामुळे आमच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
आपत्तीकाळात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल सुरू ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कोणत्या गावात कोणती आपत्ती येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल अलर्ट ठेवावा.
- गौरवकुमार भळगाटिया, तहसीलदार, धामणगाव रेल्वे
ज्या गावात आपली नोकरी आहे, त्या गावातील कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशी कुटुंबात राहिले तरी त्या गावाकडे लक्ष असले पाहिजे. पावसाळ्यात अनेक संकटांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. सुट्टी असली तरी मोबाईल सुरू ठेवण्याची गरज आहे.
- विशाल भैसे, उपसरपंच, तळणी