अमरावती : यावर्षीच्या गणेश उत्सवाकरिता अमरावती शहरासाठी ७० हजार मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्यात आल्याची माहिती मुर्तीकार संघटनेनी दिली आहे. त्याअनुषंगाने नेहरु मैदान येथील दुकाने मातीच्या मुर्तीच्या विक्रीकरीता राखीव ठेवण्यात आली आहेत.
नेहरु मैदान येथील शाळेच्या बाजुने मातीच्या गणेश मुर्तीसाठी विक्रीसाठी दुकाने असून महानगरपालिकेकडे नोंदणीकृत मातीच्या मूर्ती तयार करणा-या मूर्तीकारांकडुन मातीच्या गणेशमूर्ती विक्री करण्यात येणार आहेत. मनपा आयुक्त देविदास पवार यांनी १६ सप्टेंबर रोजी नेहरु मैदान येथील स्टॉलला भेट दिली. यावेळी विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, निलेश कंचनपुरे व मातीचे गणपतीचे मुर्तिकार उपस्थित होते.
गणेशोत्सवा दरम्यान मातीच्या मुर्तीचा वापर जास्त प्रमाणात व्हावा याकरीता महानगरपालिकेकडून जनजागृती करण्याकरीता तसेच नागरीकांना मातीपासुन निर्मित मुर्ती उपलब्ध करुन देण्याचे अनुषंगाने वेळोवेळी मुर्तीकार संघटनेच्या बैठक आयोजित करुन मुर्तीकारांनी मातीच्या मुर्ती जास्त प्रमाणात तयार कराव्यात याकरीता बैठकी दरम्यान प्रेरीत करण्यात आले होते. त्याचे फलस्वरुप म्हणून काही मुर्तीकारांकडून मातीची मुर्ती निर्मिती सुरु करण्यात आली. सन २०१७ मध्ये सुमारे ६०००, सन २०१८ मध्ये सुमारे ८००० आणि सन २०१९ मध्ये सुमारे १८,०००, सन २०२० मध्ये सुमारे ५३,०००, सन २०२१ मध्ये सुमारे ६१,००० मुर्ती बनविण्यात आल्या होत्या.
पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याकरीता मातीपासून निर्मिती केलेल्या पर्यावरण पुरक मुर्तीचा वापर करावा. गणेश मुर्ती विक्रेत्याकडे गणेश भक्तांनी मातीपासून निर्माण झालेल्या मुर्तीची मागणी करावी.-देविदास पवार, मनपा आयुक्त