अमरावती : रविवारी सायंकाळी तीन तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक ६६३.५० हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात पाच दिवसांपासून वादळवारा विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामध्ये शनिवारपर्यंत २१०० हेक्टरमधील गहू, हरभरा व संत्रा पिकांचे नुकसान झाले. यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक दीड हजार हेक्टरचे नुकसान झालेले आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी पुन्हा अमरावती, दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली.
जिल्ह्यात या पाच दिवसात तीन हजार हेक्टरमधील रब्बीची पिके, भाजीपाला व संत्राचे तीन हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रातील पंचनामे करण्याचे शासनादेश आहेत. प्रत्यक्षात क्षेत्रिय यंत्रणाच संपावर असल्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.