पान २ ची लिड
बेनोडा परिसरात भीषण आग, लक्षावधी रुपयांचे नुकसान
बेनोडा शहीद : परिसरातील महादेव चौधरी यांच्या संत्राबागेत लागलेल्या आगीत त्यांच्या मालकीची ६६३ व विजय वाघ यांची ३५ संत्राझाडे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
नागझिरी मौजा शिवारात महादेव चौधरी यांत्या मालकीच्या सर्व्हे नंबर १२५ या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या एकूण १.६२ हेक्टर क्षेत्रापैकी १.२२ हेक्टरवरील ६६३ संत्राझाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली. या संपूर्ण झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबिया बहराची संत्राफळे होती. त्या फळांचाही आगीत कोळसा झाला. शेतातील ठिबक सिंचन संचसुद्धा आगीत जळाला. यावर्षी मृगबहर मुबलक प्रमाणात नसल्याने त्यांनी गव्हाचे पीक घेतले होते. नुकताच गहू घरी नेल्याने तो वाचला. मात्र, जनावरांच्या चाऱ्यासाठीच्या दोन गवंडाच्या गंजी खाक झाल्यात. काढणीनंतरचा शिल्लक गव्हाचा पालापाचोळा शेतात असल्याने आग अनियंत्रित झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझविण्यासाठी कसरत केली. मात्र, आगीचा विळखा मोठा असल्याने त्यांना उशीर लागला आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गतवर्षीच्या दुष्काळात महत्प्रयासांनी जगविलेली बाग आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे दु:ख अनावर झाले.
संयुक्त प्रयत्न तोकडे
अग्निशमन दलाच्या आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मेहनतीने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत महादेव चौधरी यांची संत्राफळांसह संत्राझाडे, ठिंबक संच, गवंड्याच्या दोन गंज्या, शेजारच्या वाघ यांच्या शेतातील ३५ संत्राझाडे, सचिन धुमटकर यांची धुऱ्यावरील पाईपलाईन असे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलिसांनी ताफा पाठवून आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. महसूल विभागाच्यावतीने तलाठी दीक्षा गोडबोले व कृषी सहायक मुनेश्वर कुबडे यांनी पंचनामा केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई शासन - प्रशासनाने तातडीने देऊन दिलासा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
एकाच महिन्यातील बेनोड्यातील ही तिसरी आग
यापूर्वी बेनोड्यातील बर्डी परिसरातील मंदिराच्या मालकीच्या शेतात लागलेल्या आगीत जनावरांचा चारा जळून खाक झाला होता. मागील आठवड्यात मांगोना मौजातील भुपेश शर्मा यांच्या शेतातील आंबिया बहरासह १६५ मोठी संत्राझाडे व क्षेत्रातील काढणीस आलेला संपूर्ण गहू जळून खाक झाला होता. या दोन्ही आगी विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागल्या होत्या, हे विशेष.