मोर्शी : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत शनिवारी आतापर्यंतचा सर्वाधिक ७००० हजार रुपये दर मिळाला. खेडा खरेदीचा दर अद्याप ५२०० ते ६१०० रुपये आहे. म्हणजे, क्विंटलमागे ९०० ते १२०० रुपयांची तूट शेतकऱ्यांना घरपोच खरेदीच्या नावावर सहन करावी लागत आहे.
बाजार समितीत हमीभावापेक्षा अधिक दर सुरुवातीपासूनच मिळत आहे. शनिवारी २००० ते ३००० पोते तुरीची आवक झाली. प्रेमचंद पूनमचंद अग्रवाल यांच्या अडतीमध्ये शेतकरी कैलास शरद कापसे (रा. चिंचोली गवळी) यांच्याकडील तुरीला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. व्यापारी मिलिंद कणेर, अविनाश अग्रवाल, विजय अग्रवाल व घनश्याम गट्टाणी यांनी तुरीच्या लिलावात सहभाग घेतला. यावेळी बाजार समिती सचिव लाभेश लिखितकर यांचे मार्गदर्शन लाभले. सभापती अशोक रोडे व उपसभापती अरुण कोहळे तसेच संचालक मंडळाने शेतकऱ्यांना खेडा खरेदीत माल न विकता, बाजार समितीचे यार्डवर आणण्याचे आवाहन केले आहे.
------------
रोख रकमेची हमी नाही
खेडा खरेदीत मात्र ५८०० ते ६१०० रुपये दर शेतकऱ्यांच्या तुरीला मिळत आहे. शेतकऱ्यांना स्वत: उत्पादित केलेल्या मालाला अजूनही स्वत: दर ठरविता आलेला नाही. गावातील खरेदीदार असल्यास या खेडा खरेदीतही तातडीने पैसे मिळतील, याची हमी नसते.
------------------------------------------