अमरावती : शासन निर्णयानुसार मराठा आरक्षणामुळे रखडलेली इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत ७,२५० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मागणी केली. ५ डिसेंबर रोजी यादी प्रसिद्ध होणार असून, ५ ते ९ डिसेंबर दरम्यान पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्य अरविंद मंगळे यांनी दिली.
अमरावती महानगरासाठी अकरावी प्रवेशाच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्ही अशा चारही शाखा मिळून १५ हजार ३६० जागा राखीव आहेत. यात कला ३३७०, विज्ञान ६५४०, वाणिज्य २४३०, तर एमसीव्हीसी ३०३० एवढ्या जागांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या फेरीत ४,८३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. मात्र, मध्यंतरी मराठा आरक्षणामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली. परंतु, राज़्य शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने ईसीबीसी वगळून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातून प्रवेश दिला जात आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी ७,२५० अर्ज प्राप्त झालेत. १० डिसेंबरपासून तिसऱ्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
-------------------
अशी आहे शाखानिहाय प्रवेशाची स्थिती
शाखा रिक्त जागा प्रवेश मागणी
कला २२८१ १४०१
वाणिज्य १५३४ १४२४
विज्ञान ३४८७ ३७२४
एमसीव्हीसी २८२६ ७०१
-----------------------