धामणगाव रेल्वे : पोटाची खळगी भरण्यासाठी धुणी, भांडी, साफसफाई आदी काम करणाऱ्या महिला शासनाच्या विविध सवलतींपासून वंचित आहेत. दररोज पाच ते दहा घरात धुणी, भांडीची कामे करणाऱ्या महिलांना महिन्याला १५०० ते ३००० रूपयेच वेतन मिळते. तालुक्यातील ७५ घरकामगार मोलकरणी महिला शासकीय योजनांचा आधार शोधत आहेत.शहरात घरगुती काम करणाऱ्या महिला कामगारांची संख्या अधिक आहे़ वाढत्या महागाईचा सामना करताना एकट्या मानसाच्या भरोवशावर घर खर्च भागविणे कठीण जात असल्यामुळे घरकाम करून संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी महिलांना हा मार्ग अवलंबिला आहे. मात्र त्यांना आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही़ त्यांना लाभ देण्यासाठी कोणतीही सामाजिक संघटना पुढे आली नाही. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, राज्यात घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या बोर्डाची स्थापना केली तरी त्याला निधी मिळालेला नाही़ जनश्री विमा वगळता शासनाने त्यांच्यासाठी कोणत्याही योजना सुरू केल्या नाहीत. ़दिवसभर काबाडकष्ट करताना मोलकरणींना अनेक संकटांना सामोरे जावे लागते़ आजारी पडल्यास मुलीला किंवा सुनेला पाठविण्याची दमदाटीही अनेक वेळा महिलांना केली जाते. सुटी घेतल्यास आदल्या दिवशीचे काम दुसऱ्या दिवशी करून द्यावे लागते़ पण, इतके काम करूनही अत्यल्प वेतन मिळत असल्याची कैफियत या मोलकरीण महिलांची आहे.अत्यल्प वेतनात उदरनिर्वाहच होत नसल्याने मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण कसे देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी शासनाने मोलकरणींच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय करावी, बीपीएल कार्ड मिळावे़ विधवा मोलकरणींना पेन्शन मिळावी साप्ताहिक सुट्टीसह रजाही मिळाव्यात, दिवाळीत बोनस मिळावा, अशा विविध मागण्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
७५ मोलकरणींना हवाय शासकीय योजनांचा आधार
By admin | Published: June 28, 2014 12:26 AM