जिल्हा परिषद : कृषी समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय, शेतकऱ्यांना दिलासाअमरावती : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शेती साहित्यावर यापुढे ७५ टक्के अनुदानात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी सिमितीच्या सभापती अरूणा गोरले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला आहे.यासोबतच लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत साहित्य उचल करण्यापूर्वी लाभार्थी हिस्सा अगोदरच भरावा लागत होता. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता कृषी समितीने लाभार्थी शेतकऱ्यांना यापुढे साहीत्य उचल करते वेळीच हिस्स्याची रक्कम भरण्याबाबतचा ठरावसुध्दा घेतला आहे.कृषी विभागामार्फत जि.प.च्या सेस फंडातून अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीसाठी पीव्हिसी पाईप, डिझेल इंजिन, ताडपत्री, शेती अवजारे, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र अशा प्रकारचे विविध साहित्य आतापर्यंत ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येत होते. परंतु मागील काही वर्षांतील व यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता. जिल्हा परिषद कृषी समितीने शेतकऱ्यांना यापुढे शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या शेती साहित्यावर ७५ टक्के अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष महणजे आतापर्यत लाभार्थी शेतकऱ्यांना साहित्याची उचल करण्यापूर्वीच आपल्या हिस्स्याची ५० टक्के रक्कम अगोदरच भरावी लागत होती. मात्र यामध्येही बदल करीत लाभार्थी हिस्स्याची रक्कम आता साहित्य उचलताना भरावी लागणार आहे. आतापर्यंतचा ५० टक्के रकमेचा भार कमी होऊन तो २५ टक्केच करण्यात आला आहे. कृषी समितीच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यावेळी कृषी सभापती अरूणा गोरले यांनी यंदाच्या रबी हंगामातील कृषी विभागाच्या नियोजनाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. सोबतच ज्या पंचायत समितीमधील साहित्य शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले नाही ते साहित्य त्वरित वाटप करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकारी यांना दिले आहेत. सभेला कृषी सभापती अरूणा गोरले, समिती सदस्य मंदा गवई, संगीता चक्रे, बाळकृष्ण सोळंके, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
७५ टक्के अनुदानावर मिळणार शेती साहित्य
By admin | Published: October 28, 2015 12:33 AM