संदीप मानकर, अमरावती : तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ७७.२४ टक्के पाणीसाठा साचला आहे. अनेक मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पात सरासरी ८४.१२ टक्के पाणीसाठा झाल्याने या महिन्यात कोसळणाऱ्या परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
२५ मध्यम, नऊ मोठे व ४७७ लघु अशा एकूण ५११ सिंचन प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा २५३६.११ दलघमी असून, त्याची सरासरी टक्केवारी ७७.२४ टक्के आहे. १० सप्टेंबरपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील आणखी पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
बॉक्स :
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती
जलसंपदा विभागाने दिलेल्या ५ सप्टेंबर रोजीच्या पाणीसाठ्याच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ८६.१९ टक्के पाणीसाठा साचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प हा १०० टक्के भरला. या प्रकल्पातून ४४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अरुणावती प्रकल्पात ९६.३३ टक्के, तर बेंबळा ८६.७५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९४.४४ टक्के, वान प्रकल्पात ८२.३९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त २७.४४ टक्के पाणीसाठा असून पेनटाकळी प्रकल्पात ४०.६९ टक्के साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ९०.६७ टक्के पाणीसाठा असून तीन गेट उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून १० सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.
बॉक्स :
आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी
विभागातील आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून, अनेक प्रकल्प शंभरीच्या वाटेवर आहेत. शंभर टक्के प्रकल्प भरणाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, तर अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी व उतावली प्रकल्पाचा समावेश आहे.