: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये तब्बल ४ हजार ३६२ नमुने दूषित आढळले आलेट. अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणी नमुन्यांच्या तपासणीत २ हजार ४२५ नमुने दूषित आढळले आहेत. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू असून, या कालावधीत दूषित पाणीपुरवठा सर्वाधिक होतो. पाण्यात रासायनिक तत्त्व असल्यास, ते पाणी दूषित असल्याचे स्पष्ट होते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने १ एप्रिल ते ३० जुलै दरम्यान पाच जिल्ह्यांतील पाणीनमुन्यांची रासायनिक तपासणी केली. त्यात पाचही जिल्ह्यांतून तब्बल १९ हजार २७४ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी तब्बल ८ हजार ८७ नमुने दूषित (अनफिट) आढळून आले. रसायनयुक्त पाणी पिण्यास अयोग्य असून, या रसायनयुक्त पाण्याचे घातक परिणाम मानवी शरीरावर होते. वारंवार हे दूषित पाणी पिण्यात आल्यास किडनी व लिव्हरवर परिणाम होते. सोबत अशा दूषित पाण्यामुळे दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे व त्वचारोग होण्याची दाट शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अशा दूषित पाण्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत विविध आजारांचे रुग्ण वाढले असून, शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांचा ओघ सुरू असल्याचे आढळून आले आहे. दूषित पाण्यावर उपाययोजनेसाठी प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र पाचही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
पाणी नमुन्यात तपासली जातात ही रसायने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे प्राप्त झालेल्या पाणीनमुन्यात नायट्रेट, टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह्ड सॉलिड), क्लोराइड, फ्लोराइड, टोटल हार्डनेस, अल्कनिटी, पीएच, आर्यन, सल्फेटचे अवशेष आहेत का, हे तपासले जाते. यापैकी कोणतेही रसायन आढळल्यास ते पाणी दूषित (अनफिट) ठरविले जाते. वर नमूद केलेल्या दूषित पाण्यात यापैकी काही रसायने आढळून आली आहे. त्यामध्ये पाण्यात नायट्रेटचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जीएसडीने दिली आहे.
दूषित पाण्यात यवतमाळ अव्वलविभागातील पाच जिल्ह्यांतील १९ हजार २७४ पाणी नमुन्यांपैकी ८ हजार ८७ नमुने दूषित आढळले. त्यामध्ये अमरावतीमधील ५ हजार ४८८ पाणीनमुन्यांच्या तपासणीत २ हजार ४२५ दूषित आहेत. त्याच प्रमाणे अकोला येथील १ हजार ८७८ नमुन्यांपैकी तब्बल १ हजार २८ नमुने दूषित, यवतमाळातील ६ हजार ७९२ पैकी २ हजार ४४०, वाशिम येथील ८४८ पैकी २१५, तर बुलडाणा येथील ४ हजार २६८ पैकी १ हजार ९८९ नमुने दूषित आढळले.
रसायनयुक्त पाणी किडनी व लिव्हरवर परिणाम करते. मध्यंतरी यवतमाळात किडनीचे रुग्ण वाढले होते. अशा दूषित पाण्यामुळे किडनी स्टोन हे एक कारण असू शकते. अशा रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय.