अमरावती : ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात नागरिक नववर्षाच्या स्वागताकरिता वाहनासह रस्त्यावर येतात. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्तालयाकडून बंदोबस्ताकरीता दोन पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त तसेच ८० पोलीस अधिकारी, ७०० पोलीस अंमलदार वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, आरसीपी व क्युआरटी पथके इत्यादी नेमण्यात येणार आहेत.
शहराच्या प्रमुख चौकात तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आवश्यक ठिकाणी बॅरिकेटींगद्वारे नाकाबंदी करण्यात येणार असून सर्व उड्डाण पुलांवरून वाहतुकीस बंदी असणार आहे. ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात येणार असून त्याकरीता ब्रेथ ॲनालायझर या उपकरणाचा वापर करण्यात येणार आहे. स्टंट रायडिंग, भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्याकरीता इन्टरसेप्टर वाहन तैनात करण्यात येणार आहे. शहरामध्ये पायी व दुचाकीद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार असून सतर्कतेबाबत पोलीस विभागांच्या वाहनावरून पीए सिस्टीमद्वारे सूचना देण्यात येणार आहेत.
कारवाईसाठी विशेष पथके
ऑनलाईन ई-कॉमर्स फटाके खरेदी विक्रीवर पूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस उत्सव व ३१ डिसेंबर नूतन वर्षा निमित्त फटाके फोडण्याची वेळ रात्री ११.५५ वाजल्यापासून ते रात्री १२.३० पर्यंत राहील. सर्व नागरिकांनी या वेळेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले आहे. २५ डिसेंबर ख्रिसमस उत्सव व ३१ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालय स्तरावर विशेष पथक गठीत करण्यात आलेले आहेत.