अमरावती : गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून देण्यासाठी झेडपीला नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. गुणवत्तेसोबतच दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या काही शाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून दिला आहे. यासाठी काही शिक्षकांनी अधीक्षकांच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. स्मार्ट सिटी उपक्रमाच्या धर्तीवर आता गावांनाही वेगळा लुक देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रापं कार्यालय अद्ययावत करणे, गावात सर्व सोयी उपलब्ध करुन देणे, पाणी, दिवाबत्ती, दर्जेदार रस्ते, रंगरंगोटी, सुसज्ज संग्राम कक्ष, आॅनलाईन आणि पारदर्शक कामकाज, पथदिवे, गावात स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छ शाळा, अंगणवाडी, मुलांसाठी क्रीडांगणे, समाजपयोगी उपक्रम तसेच शासकीय योजनांचा लाभ देणे, जनजागृती, लोकप्रबोधनासंदर्भात गावातील दर्शनी भागात फलक लावणे आदी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये अशा मूलभूत सुविधांची वानवा असल्याने जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळी एक ग्रामपंचायत ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करू शकली आहे. ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरिता ग्रामपंचायतींची संख्या वाढणे गरजेचे आहे.
८३८ ग्रामपंचायती ‘आयएसओ’मध्ये ढांग
By admin | Published: March 31, 2016 12:26 AM