अमरावती : जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ८४० ग्रामपंचायतींकडे घरपट्टीपोटी ३४ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपये करवसुली मार्चअखेर होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊन व अन्य कारणांमुळे १२ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये वसुली थकली आहे. या रकमेच्या वसुलीचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर उभे ठाकले आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांकडून पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती कर दरवर्षी वसुल केले जातात. मात्र, गत मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा करवसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. २३ मार्च ते जून या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. अशातच अनेकांचे रोजगार गेल्यामुळे आर्थिक घडीही विस्कळीत झाली होती. त्यानंतर जुलैपासून परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत असतानाच, पुन्हा कोरोनाने जानेवारी महिन्यापासून डोके वर काढले. यामुळेही करवसुलीवर परिणाम झाला आहे. ८४० ग्रामपंचायतींना सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मार्च अखेरपर्यंत सामान्य कराची वसुली ३४ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपयांची वसुली अपेक्षित होते. त्यापैकी २१ कोटी ७१ लाख ६० हजार एवढीच कराची वसुली झाली आहे. अद्यापही १२ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपयांची कराची रक्कम थकीत आहे. ही थकीत रक्कम मार्च एडिंगपर्यंत वसूल करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसमोर आहे. विशेष म्हणजे, पाणीपट्टीचीही कर वसुली थकीत आहे.
----------------
विकासकामांवर परिणाम
ग्रामपंचायतीमार्फत केली जाणारी बरीच विकासकामे ही करवसुलीच्या भरवशावर केली जातात. मात्र, गत मार्च महिन्यापासून सर्वच तालुक्यांतील ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोठया प्रमाणात थकीत आहे. परिणामी याचा विकासकामांनाही फटका बसत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे कर वसुलीला काहीसा फायदा झाला. त्यानंतर पुन्हा कर वसुलीची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.