लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सीमेवर ओमायक्रॉन धडकल्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णासाठी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील चौथ्या माळ्यावर ९५ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय पुरेसा औषध साठादेखील उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संक्रमण दर जास्त असल्यामुळे प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर नमुने घेतले जात आहेत व त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी काही निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. याशिवाय एकही ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद नाही. तरीही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसताना जिल्हा व मनपा प्रशासनाची यंत्रणा गपगार आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण पाय पसरण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेचा सर्व जोर सध्या लसीकरणावर आहे. जिल्ह्यात साधारणपणे ८० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणासाठी मोहीम व अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये रोज २०च्या वर शिबिरे घेण्यात येत आहेत. याद्वारे मोहीम गतिमान करण्यात आली आहे.
शहरात १०, ग्रामीणमध्ये एक पॉझिटिव्ह कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. चार महिन्यांत संक्रमितांच्या दुहेरी संख्येची नोंद नाही. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत १० व ग्रामीण भागामध्ये फक्त एक सक्रिय रुग्ण आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्हच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण उच्चांकी ९८.३३ टक्के आहे.
आरोग्य यंत्रणा अलर्टओमायक्राॅनच्या रुग्णांसाठी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील चौथ्या माळ्यावर ८५ बेड तयार आहेत. याशिवाय औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा साठाही पुरेसा आहे. आरोग्य विभागाद्वारे सर्व खबरदारी घेतली जात आहे.- डॉ. श्यामसुंदर निकम जिल्हा शल्य चिकित्सक