मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : मूत्राशयाचा विकार, हृदयविकार, पोटाचा विकार, भोवळ येऊन पडणे, मधुमेह, रक्तदाब, नेत्रविकार, निद्रानाश या व्याधींसोबतच कोरोनाच्या भीतीने धामणगाव तालुक्यात एका महिन्यात ८० वृद्धांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस वाढत्या अनेक आजारांमुळे वृद्धांचे आयुष्यमान घटत आहे. मात्र, भीती दाटून येण्याऐवजी आवश्यक ती काळजी घेऊन आयुष्य आनंदी करा, असे आवाहन वैद्यक मंडळींनी केले आहे.
धामणगाव तालुक्यात गत एका महिन्यात दरदिवशी पावणेतीन या दराने ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी बाहेर आली आहे. ६३ ते ९० वर्षे वयोगटातील या ज्येष्ठांनी आपले संपूर्ण आयुष्य आनंदमय व संघर्षमय जगून अखेरचा विसावा घेतला. वाढत्या वयातील आजारपण
ही ज्येष्ठ नागरिकांसाठी समस्या बनली आहे. तालुक्यात बहुतांश ज्येष्ठ स्मृतिभ्रंशामुळे त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, कधी कडक उन्ह तापणे, तर कधी आभाळ, वादळी पाऊस येत असल्याने कफ, दमा तसेच अपचन, पित्त आणि वात विकारांनी ज्येष्ठांना ग्रासले आहे. बदलत्या वातावरणाने आजारांचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनाने घेतले १८ बळी
तालुक्यात चिंचोली येथे सारीने एक जणाचा बळी घेतला. तळेगाव दशासर, तिवरा, शेंदूरजना खुर्द, अंजनसिंगी, ढाकूलगाव, कळाशी, जुना धामणगाव व धामणगाव शहरातील आठ अशा एकूण १८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
--------------
कोरोनाच्या दुसरी लाटेत ज्येष्ठ व्यक्तींच्या जिवाला धोका वाढला आहे. मागील अनेक दिवसांपासून ताप येणे, छातीत दुखणे, चक्कर येणे असे विविध आजार आढळल्यास ज्येष्ठांना त्वरित रुग्णालयात नेण्याची गरज आहे. त्यांची आस्थेने विचारपूस करून काळजी घ्यावी.
- डॉ. आकाश येंडे, हृदयरोगतज्ज्ञ, धामणगाव रेल्वे