मनस्ताप : सलग चौथ्या दिवशीही बँकांसमोर रांगा, एटीएम बंदचअमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील ३३१ बँकांमध्ये रविवारी दुपारपर्यंत ८५० कोटी रूपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील लाखो ग्राहकांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकांमध्ये जमा केल्यानंतर हे ८५० कोटी जमा झाले आहेत. तथापि आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील बँकांकडे केवळ ६० कोटी रूपये आल्याने ग्राहकांसह बँकांचीही त्रेधा उडालीे. विशेष म्हणजे दोन हजाराच्या चलनामध्ये हे ६० कोटी रुपये आल्याने शंभरच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अद्यापही पाचशेची नवीन नोट बँक किंवा एटीएममधून विड्रॉल करण्यात आली नाही. मंगळवारी मध्यरात्री निर्णय जाहीर झाल्यानंतर बुधवारी देशभरातील बँका व एटीएम बंद ठेवण्यात आले होते. गुरूवारपासून बँका आणि एटीएमसमोर रांगा लागल्या. जवळच्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बँकेसह डाकघर आणि सहकारी बँकांमध्येही तीन दिवसांपासून ग्राहकांना मन:स्ताप सहन करून रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नवीन नोटांवर कमिशनपाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटा मिळविण्यासाठी बँकांसह एटीएममध्ये गर्दी होत असताना ज्यांच्याकडे शंभराच्या नोटा उपलब्ध आहेत त्यांनी दोन हजारांच्या नव्या नोटांच्या मोबदल्यात १ हजार ८०० ते १ हजार ९०० रुपये देणे सुरु करून शंभर ते दोनशे रुपये कमिशन घेणे सुरु केले आहे. पेट्रोलविक्रीत दुपटीने वाढमंगळवारी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्या असल्या तरी त्या शुक्रवार व पुढे १४ नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे दररोज जिल्ह्यात पेट्रोलची सरासरी दोन लाख लिटर विक्री होते. ती गेल्या तिन दिवसांपासून चार लाखांवर पोहचली आहे. पेट्रोलपंप चालकांकडून तीनशे, पाचशे किंवा आठशे रुपयांचे पेट्रोल-डिझेल भरण्याची सक्ती केली जात असल्याने नाईलाजाने वाहनचालकांना टाकी फुल्ल करावी लागत आहे. बँकांमध्ये चलन टंचाईपाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता बँकांमध्ये चलन टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. शंभरांच्या नोटांचा कृत्रिम तुटवडा भासविल्या जात असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. बँकांसमोर शनिवारच्या तुलनेत रविवारी अधिक गर्दी दिसून आली. तथापि एटीएम सुरु होणार असल्याचे जाहीर करूनही बहुतांश एटीएमचे शटर्स बंद राहिले. बाजारातून शंभराच्या नोटांना प्रचंड मागणी आल्याने बँकांमधूनही दोन हजारांच्या नव्या नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या.त्यामुळे शंभरांच्या नोटा हजाराला सातशे आणि पाचशेला तीनशे रुपये दरात उपलब्ध होत असल्याची चर्चा होती. शहराच्या विविध बँकात शंभरांच्या नोटाची चणचण जाणू लागली आहे. पोस्टालाही मोठ्या प्रमाणात हिच स्थिती जाणवली. पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे ८५० कोटींच्या नोटा जमा झाल्यात. पाचशेच्या नवीन नोटा अद्याप आल्या नसून दोन हजारांच्या अंदाजे ६० कोटींच्या नोटा आल्या आहेत. -सुनील रामटेके, व्यवस्थापक अग्रणी बँक.
८५० कोटी जमा, ६० कोटीच प्राप्त
By admin | Published: November 14, 2016 12:05 AM