अमरावती : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीत केंद्र शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना प्रत्येकी १० टक्केप्रमाणे एकूण ९ कोटी ५१ लाख रुपयांचा शासनाकडून दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात (टाईट ग्रॅंड) नुकतीच प्राप्त झाली आहे.
शासनाकडून प्राप्त पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानात १० टक्क्याप्रमाणे ४ कोटी ५२ लाख ५५ हजार रुपये जिल्हा परिषदेला, तर अमरावती, भातकुली, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या तालुक्याच्या पंचायत समित्यांना १० टक्केप्रमाणे ४ कोटी ५२ लाख ५५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता प्राप्त झाला आहे. या रकमेतून पंचायत समितीनिहाय अनुदानाचे वितरण जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून केले जाणार आहे. सदरचा निधी नियोजना नंतर संबंधित पंचायत समित्या बँक खात्यावर थेट जमा केला जाणार आहे. या निधीतून ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे विकासकामे केली जाणार आहे. यात पाणीपुरवठा व स्वच्छता व अन्य महत्त्वाच्या कामांवर भर द्यावा लागणार आहे.