८६५ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना ठरणार 'माईलस्टोन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:06 PM2024-09-27T13:06:59+5:302024-09-27T13:07:57+5:30

अजित पवार : पाणीबाणीवर मात, १४२० कोटींतून विकासकामे प्रारंभ

865 crore increased for water supply scheme will be 'milestone' | ८६५ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना ठरणार 'माईलस्टोन'

865 crore increased for water supply scheme will be 'milestone'

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
अमृत-२ वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत राज्य शासनाने ८६५.२६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तपोवन परिसर येथे या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. अमरावतीकरांकडे धरण होते; परंतु पाणी पोहोचवणारी पाइपलाइन जुनी झाल्याने ते शहराला पाणी पोहोचविताना अडचणी येतात; या निधीमुळे आता अमरावतीकरांचा २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार असल्याचे ना. पवार म्हणाले. 


शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी १४२० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा नियोजनच्या सभागृहात गुरुवारी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे उपस्थित होते.


जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीची मागील सात वर्षांपासून जिल्ह्याला प्रतीक्षा होती. आता ही इमारत काही दिवसातच रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होणार असल्याने जुन्या इमारतीमध्ये होणारे गर्भवती व नवजातांचे हाल थांबतील. 


सारथी'ला ५०० आसन क्षमतेचे श्रोतृगृह
शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. त्या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. 'सारथी' संस्थेमध्ये ३०० आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे; मात्र आता राज्यातील सर्व 'सारथी'च्या ठिकाणी ५०० क्षमतेचे श्रोतृगृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. 


विभागीय स्तरावर क्रीडा सुविधा 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलिंडर तसेच 'सारथी', 'बार्टी'सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही अजित पवार म्हणाले.


उपमुख्यमंत्र्यांकडून विविध कामांचे उद्घाटन 
पाणीपुरवठ्याची अमृत योजना, 'सारथी'चे विभागीय कार्यालय, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा मैदानाचे भूमिपूजन तसेच जिल्हा स्त्री र रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वस्तू व सेवा कर इमारतीचे • नूतनीकरण, विदर्भ ज्ञान- विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, वडाळी उद्यान सौंदर्याकरण, उत्पादन शुल्क विभागाची इमारत तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाइन भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन केले. 

Web Title: 865 crore increased for water supply scheme will be 'milestone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.