संदीप मानकर/ अमरावती : सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा असून, विभागातील ५११ सिंचन प्रकल्पात ८८.१६ टक्के पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासह आता सिंचनाचीही चिंता मिटली आहे. आणखी चार दिवस पाऊस असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.
नऊ मोठ्या प्रकल्पात ९३.७९ टक्के पाणीसाठा आहे. २५ मध्यम प्रकल्पात ८८.४१ टक्के पाणीसाठा असून, ४७७ लघु प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा आहे. ५११ सिंचन प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२८३.६० दलघमी असून, आजचा उपयुक्त पाणीसाठा २८९४.७४ दलघमीएवढा आहे. त्याची सरासरी टक्केवारी ८८.१६ टक्के आहे. २८ सप्टेंबरपर्यंत पाऊस असल्याचा अंदाजही हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविल्यामुळे आवक असलेल्या प्रकल्पाची दारे उघडली आहेत.
बॉक्स:
मोठ्या नऊ प्रकल्पांची स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९८.८ टक्के पाणीसाठा असून, प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १०० टक्के, अरुणावती ९९.९४ टक्के पाणीसाठा असून ९ गेट, बेंबळा प्रकल्पात ९३.३८ टक्के पाणीसाठा तर २ गेट उघडण्यात आले. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९७.९४ टक्के पाणीसाठा आहे. २ दारे उघडली आहे. वान प्रकल्पात ९५.४९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा ६३.९९ टक्के, पेनटाकळी ६१.३५ टक्के तर खडकपूर्णा प्रकल्पात ९०.०४ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बॉक्स:
१३ मध्यम प्रकल्पाने गाठली शंभरी
विभागातील १३ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, बोरगाव, नवरगाव, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा, वाशिममधील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, कोराडी, उतावळी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.