- गजानन मोहोड अमरावती - यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे. विभागातील चार जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल प्राप्त असताना बुलडाणा जिल्ह्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्यामुळे शासनाला मदतीची मागणी करावयाचा विभागाचा प्रस्ताव रखडला आहे. अमरावती विभागात यंदाच्या खरिपात ८ लाख ६० हजार शेतकºयांनी १० लाख ७१ हजार १९ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केली. मात्र, आॅक्टोबर महिण्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने एकूण क्षेत्राच्या तुलनेत ९० टक्के म्हणजेच ९ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीचे ३३ टक्कयांवर नुकसान झाले आहे. प्राप्त चार जिल्ह्यांतील संयुक्त अहवालानुसार यामध्ये जिरायती कपाशीचे ७ लाख २६ हजार ७७ हेक्टर तर बागायती कपाशीचे एक लाख ३४ हजार ३५८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायतीन क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रूपये या प्रमाणे ५०१ कोटी ८२ लाख २९ हजार तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे १८० कोटी ८७ लाख १४ हजारांची मदत आवश्यक आहे. हे नुकसान केंद्राच्या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी पात्र आहे. बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंडअळीने बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश ७ डिसेंबरला विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी पाचही जिल्ह्यधिकाºयांना देऊन अहवाल मागविला. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपाशी पीकबाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या अनुषंगाने कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व तुडतुड्यांमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी दिले होते. या अनुषंगाने पाचही जिल्हाधिकाºयांनी संबंधित तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकाºयांना संयुक्त अहवाल मागविला होता. सद्यस्थितीत बुलडाणा वगळता सर्व जिल्ह्यांचे संयुक्त अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त आहेत.
विभागातील कपाशीचे नुकसान, आवश्यक मदत- अमरावती जिल्ह्यात २,२०,२६५ शेतकºयांच्या १,९९,१७३ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले. यासाठी १८२.६० कोटींची मदत अपेक्षित आहे.- अकोला जिल्ह्यात १,३३,६६८ शेतकºयांच्या १,४३,४८१ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी १३५.५१ कोटींची मदत अपेक्षित आहे.- यवतमाळ जिल्ह्यात ३,५८,४८५ शेतकºयांच्या ४,९४,५७५ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले, यासाठी ३४९.१७ कोटींची भरपाई अपेक्षित आहे.- वाशिम जिल्ह्यात २२,५११ शेतकºयांच्या २३,२०७ हेक्टरमधील कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने १५.४० कोटींची मदत आवश्यक आहे.