अमरावती : गेले दोन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तथा दमदार पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघु, अशा एकूण ९० प्रकल्पांत सरासरी ८४.३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे.
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ९८.३६ टक्के पाणीसाठा झाला असून, १३ पैकी १० गेट बंद करण्यात आले असून, आता ३ गेट ३५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये शहानूर प्रकल्पात ९४.०७ टक्के पाणीसाठा, तर ४ गेट ५ सेंमीने उघडले. चंद्रभागा प्रकल्पात ९३.३६ टक्के पाणीसाठा असून, २ गेट ५ सेंमी, तर पूर्णा प्रकल्पात ७९.७९ टक्के, तर ३ गेट १० सेंमीने उघडण्यात आले. सपनमध्ये ९०.७५ टक्के, तर पंढरी मध्यम प्रकल्पात १३.९५ टक्के पाणीसाठा असून, एकूण पाच प्रकल्पांत सरासरी ७०.२४ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती गुरुवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ८४ लघु प्रकल्पांत ६३.३५ टक्के पाणीसाठा आहे.