अमरावती : चार दिवसांपासून तुटवडा असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचे ९०० व्हायल गुरुवारी जिल्ह्यास उपलब्ध झालेत व ते सर्व कोविड रुग्णालयांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्याची मागणी दोन ते अडीच हजार रेमडेसिविरची असल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झालेली आहे.
कोरोना रुग्णांवर गुणकारी असलेले रेमेडेसिविरची सध्या मोठी मागणी असताना त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. चार दिवसांपूर्वी ३०० रेमेडेसिविर उपलब्ध झाले व एका दिवसांत संपले होते. जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून उसणवार पद्धतीने पीडीएमएमएसी शहरातील कोविड रुग्णालयांना ४०० रेमेडेसिविर उपलब्ध केले होते व डॉक्टरांच्या विहित फाॅर्मवर रुग्णांसाठी ते उपलब्ध करण्यात येत होते. यासाठी मोठी रांग सकाळपासून राहत असल्याचे दिसून आले.
रेमेडेसिविरचा काळाबाजार होऊ नये, त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. याशिवाय एफडीएद्वारा यावर वॉच‘ ठेवण्यात येत असला तरी मागणी एवढा पुरवठा नसल्यामुळे जिल्ह्यात रेमेडेसिविरचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झालेला आहे. जिल्ह्यास गुरुवारी प्राप्त ९०० इंजेक्शन हे हेटेरो व सिप्ला कंपनीचे असल्याचे एफडीएचे औषधी निरीक्षक महेश गोतमारे यांनी सांगितले.
बॉक्स
अन्य जिल्ह्यातील रुग्ण दाखल झाल्याने वाढली मागणी
सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर ताण आला व रुग्ण अमरावती जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. त्यामुळे रेमेडेसिविरची मागणी वाढली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यासाठी अधिक मागणी नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
डेपोकडे ३० लाखांवर ॲडव्हांस जमा
रेमेडेसिविरसाठी विविध कंपनीच्या नागपूर येथील डेपोत जिल्ह्यातील स्टॉकिस्टने ३० लाखांवर आगाऊ रक्कम जमा केलेली आहे. यासाठी बहुतेक मेडीकल दुकानदारांनी एक ते दीड लाखांपर्यतची रक्कम दिल्याची माहिती एफडीएद्वारा देण्यात आली. मात्र, मागणी इतका पुरवठा अध्यापही झालेला नसल्याने तुटवडा निर्माण झालेला आहे.