पोलीस भरती प्रक्रिया : दुसऱ्या दिवशी १ हजार ८८४ उमेदवारांची चाचणी अमरावती : शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ९१९ तरुणांनी शारीरिक चाचणीचा पहिला टप्पा ओलांडला. बुधवारी पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा १ हजार ८८४ उमेदवारांना बोलाविण्यात आले असून त्यांच्या अन्य चाचण्या होणार आहे. अमरावती शहर पोलीस ३१, ग्रामीणचे २७ तर एसआरपीएफमधील ४० जागेच्या पोलीस भरतीसाठी तब्बल ७ हजार ५७२ उमेदवारांचे अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले होते. मंगळवारपासून पोलीस मुख्यालय, जोग स्टेडीअम व एसआरपीएफ कॅम्प येथील प्रांगणात भरती प्रक्रिया सुरु झाली. त्यामध्ये तिन्ही पोलीस विभागामार्फत दररोज ५०० ते ८५० उमेदवारांना विविध चाचण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यामध्ये शहर पोलीस विभागाने पहिल्या दिवशी ८५० उमेदवारांना बोलाविले होते. त्यापैकी ६४५ उमेदवार हजर राहिले. व २०५ गैरहजर होते. पोलिसांनी ६४५ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यामध्ये ८९ उमेदवार अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या ५५६ उमेदवारांची उंची व छातीची मोजमाज करण्यात आली. यात ४४५ उमेदवार पात्र व १११ उमेदवार अपात्र ठरले. या पात्र उमेदवारांची दौड चाचणी घेण्यात आली असता त्यामध्ये ३६८ उमेदवार पात्र तर ७७ उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी ७०० उमेदवारांना बोलाविले असता ५२२ उमेदवार उपस्थित राहिले. यात ३३३ उमेदवार कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र ठरले. पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली असता या चाचणीत २४२ उमेदवार पात्र ठरले असून ९६ उमेदवार अपात्र ठरले. त्याचप्रमाणे एसआरपीएफच्या भरतीप्रक्रियेत ५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ३९८ उमेदवारांनी उपस्थित दर्शविली असून त्यांपैकी ३०९ उमेदवार चाचणीत पात्र ठरले आहेत. पोलीस भरतीचा मंगळवारी पहिला दिवशी पोलीस विभागामार्फत विविध सुविधा करून या चाचण्या घेण्यात आल्या असून बुधवारी सुध्दा १ हजार ८८४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे. पोलीस भरतीचे नियोजन असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली नाही.दौड चाचणीच्या वेळी उमेदवारांची गैरसोयपोलीस आयुक्तांनी शहर पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात उमेदवारांसाठी विशेष सोयी केल्या आहेत. सावलीसाठी मंडप, नास्ता, ज्युस व पाण्याचे स्टॉल लावण्यात आल्याने उमेदवाराना सोयीचे झाले आहे. मात्र, या उमेदवारांची १६०० मिटर दौड चाचणी ही जिल्हा स्टेडिअमच्या मैदानात असल्यामुळे तेथे उमेदवारांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक उमेदवारांची पाण्यासाठी भटंकती सुरु असल्याचे दिसून आले.
९१९ उमेदवारांनी ओलांडला पहिला टप्पा
By admin | Published: March 31, 2016 12:21 AM