अमरावती : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेद्वारे ९४ टक्के मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने ८५ वर्षांहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी १२ डी नमुना भरून दिला अशा मतदारांकडून गृहमतदान करण्यात आले. अमरावती लोकसभा मतदारसंघातील एकूण १ हजार १६७ नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली होती. त्यापैकी १ हजार १०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या ९२२ आणि दिव्यांग मतदारांची संख्या १८२ आहे. गृहमतदानाची प्रक्रिया १२ ते १४ एप्रिल दरम्यान राबविण्यात आली. प्रक्रिया विधासभानिहाय मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलिस व व्हिडीओग्राफर यांचामार्फत पारदर्शक व गोपनीय पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
९४ टक्के दिव्यांग अन् ज्येष्ठांनी बजावला गृहमतदानाचा हक्क
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 15, 2024 20:49 IST