अमरावती : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी व उमेदवार, पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी होत आहे. २३ डिसेंबरपासून ११ हजार ७८९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील ९५ अधिकारी, कर्मचारी व उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये अमरावती तालुक्यात ७५०, भातकुली तालुक्यात ८६३, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ८८३, दर्यापूर तालुक्यात ९५३, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ८२९, तिवसा तालुक्यात ५३९, चांदूर रेल्वे तालुक्यात ५६१, धामणगाव रेल्वे तालुक्यात ६१३, अचलपूर तालुक्यात ९७२, चांदूर बाजार तालुक्यात १२५४ मोर्शी तालुक्यात १०७६, वरूड तालुक्यात ८७६, धारणी तालुक्यात ९७१ व चिखलदरा तालुक्यात ६४९ चाचण्या करण्यात आल्या. धारणी तालुक्यात ४१, अमरावती तालुक्यात १८, वरूड तालुक्यात ७, चांदूर रेल्वे व दर्यापूर तालुक्यात ६, तिवसा व भातकुली तालुक्यात ४, मोर्शी तालुक्यात ३, नांदगाव खंडेश्वर व चिखलदरा तालुक्यात २, तर अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी १ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. त्यात उमेदवारांसह मतदान अधिकारी, तलाठी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, शिक्षक आदींचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज, चिन्हवाटप, मतदान व मतमोजणी प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया, उमेदवारांचा प्रचार, हॉलमध्ये मतमोजणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व एजंट या सर्वांसाठी आयोगाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत व त्याचे पालन प्रक्रियेतील सर्वांनाच बंधनकारक आहे.