अमरावती : सध्या विभागात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातील ९६४ गावांना लहान-मोठ्या नदी-नाल्यांच्या पुरापासून धोका असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या नदींच्या काठावर वसलेल्या ५९८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.
यामध्ये सर्वात जास्त ४८२ गावे अमरावती जिल्ह्यातील आहेत. ११ मोठ्या नद्यांपासून ३०२ गावांना पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ६५६ तात्पुरते निवारे उभारण्यात आलेले आहेत. याशिवाय अकोला जिल्ह्यातील ७७ गावे पूरप्रवण आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १५६, बुलडाणा २३५, तर वाशिम जिल्ह्यात ७४ गावे पूरप्रवण आहेत. या अनुषंगाने नागरिकांना तात्पूरता निवाऱ्यात आश्रय देण्यासाठी १,४६८ निवारे उभारण्यात आलेले आहे. या सर्व पूरप्रवण गावांची ९.१८ लाख लोकसंख्या आहे.
विझेला अटकाव करण्यासठी २२ लाईटनिंग अरेस्टर तयार करण्यात आलेले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी विभागात १५ रबरबोट, ७ फायबरबोट, ७८७ लाइफ जॉकेट, ५७५ लाइफबोये, ५,७०० मीटर रोप बंडल उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
शोध व बचाव पथकात १,१५७ मनुष्यबळ
आपत्तीच्या अनुषंगाने विभागात शोध व बचाव तयार तत्पर करण्यात आलेले आहे. यात सद्यस्थितीत १,१५७ मनुष्यबळ आहे. १२० प्रथमोपचार तज्ज्ञ, १४ रेडीओ ऑपरेटर, ११ स्कुबा ड्रायव्हर, १६७ मास्टर ट्रेनर व ३६ एनजीओ राहणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे व तो २४ तास सुरू आहे.