अमरावती : दहा महिन्यांत पहिल्यांदा कोरोना संसर्गाने पहिल्यांदा डोके वर काढले आहे. यामध्ये मार्च महिन्यात ९९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. महापालिका क्षेत्रात एका विशिष्ट भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे झाले आहे.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात नोंद पॉझिटिव्ह हे कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तन झालेल्या एक्सबीबी १.१६ या व्हेरिएंटचे आहे. नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. याशिवाय कोरोनासारखेच एन्फ्लूएंझाच्या एच३एन२ विषाणूचीदेखील लक्षणे असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाल्यास रुग्णाची काळजी महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी कोरोनाची चौथी लाट आली नसली, तरी काही प्रमाणात संसर्ग वाढला होता. त्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आहे. कोमॉर्बिड आजाराच्या नागरिकांची काळजी महत्त्वाची आहे. सध्या बहुतांश नागरिक गृहविलगीकरणात राहूनच उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत ज्या नागरिकांचा बूस्टर डोस राहिला आहे, त्यांनी त्वरित घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.कोरोनाची मार्चमधील स्थिती
जिल्ह्यात १ मार्चला कोरोनाच्या एका पॉझिटिव्हची नोंद झाली होती. आतापर्यंत रुग्णसंख्या १,०७,१३२ झाली. त्यानंतर ३१ मार्चला सहा रुग्णांची नोंद झाली व रुग्णसंख्या १,०७,२३१ वर पोहोचली आहे. म्हणजेच, एका महिन्यात तब्बल ९९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. याशिवाय एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला आहे.‘मास्कचा वापर करा’चे लागले फलक
कोरोनाचा विषाणूचा संसर्ग महापालिका क्षेत्रात वाढू लागताच काही शासकीय कार्यालयासोबतच महापालिकेच्या गेटवरच मास्कचा वापर करण्याचे फलक लागले आहे. सध्या जिल्ह्यात कुठलेही निर्बंध लागू नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.